नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहीपूल भागात वाहनाला धडक देत एकाने महिलेस मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेत जीवे ठार मारण्याची धमकी देत संशयिताने चेह-यावर बुक्की मारल्याने महिला जखमी झाली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश दौलत भुरीया (२५ रा.जगतापमळा,देवळालीगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित महिला सोमवारी (दि.८) दुपारच्या सुमारास आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. दहीपूल येथी जयजय चौकातील पलक लेडीज वेअर दुकानासमोरून प्रवास करीत असतांना विरूध्द दिशेने येणा-या एमएच १५ जीजे ९५७३ या दुचाकीने महिलेच्या अॅक्टीव्हाला जोरदार धडक दिली.
यावेळी महिलेने संशयितास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिला शिवीगाळ व दमदाटी करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार हातघाईवर गेल्याने संशयिताने महिलेचा विनयभंग करीत तिच्या तोडावर बुक्का मारला असून त्यात ती जखमी झाली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.