मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, पुणे जिल्हासंपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर तसेच इतर शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधतांना सांगितले की, तुम्ही पहिले शिवसैनिक होतात. मधल्या काळात शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो, याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतला आहात. त्यामुळे आज तुमचं महत्त्व, काम आणि जबाबदारी फार मोठी आहे. मी शिवबंधन बांधत असताना काहींनी मला आम्हीही शिवसैनिक होतो, असं सांगितलं.
मग आता तुम्हाला शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा ही झालीच पाहिजे. ती वसंत मोरेंनाही व्हायला पाहिजे. मी तुम्हाला देतोय ती शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यात शिवसेना वाढवून हवी आहे. ती वाढवण्याची जबाबदारी मी वसंत मोरेंना देतोय. शिक्षा हा गंमतीशीर शब्द आहे तो तशा पद्धतीने घेऊ नका. पण ही जबाबदारी म्हणून घ्या.