नाशिक, (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक डाक विभागात टपाल जीवन विमा योजनेसाठी फिल्ड ऑफिसर पदासाठी मुलाखतीद्वारे थेट नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी २४ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता प्रवर डाक अधीक्षक, नाशिक विभाग यांच्या कार्यालयात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह नियोजित स्थळी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर नाशिक विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
फिल्ड ऑफिसर पदासाठी सेवानिवृत्त केंद्र अथवा राज्य सरकारी अधिकारी/कर्मचारी किंवा सेवामुक्त ग्रामीण डाक सेवक आणि नमूद अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींची मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी स्वखर्चाने येतांना सेवानिवृत्त/सेवामुक्त झाल्याचा पुरावा, ३ पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. अधिक माहितीसाठी प्रवर डाक अधीक्षक, नाशिक विभाग यांचे कार्यालय, तसेच जवळच्या कोणत्याही डाक कार्यालयात इच्छुकांनी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
फिल्ड ऑफिसर पदासाठी आवश्यक पात्रता व अटी….
• उमेदवार हा सेवानिवृत्त केंद्र अथवा राज्य सरकारी अधिकारी/ कर्मचारी किंवा सेवामुक्त ग्रामीण डाक सेवक असावा.
• सध्या कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा.
• उमेदवाराच्या कमाल वयाची अट नाही.
• फिल्ड ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्या विरोधात कुठलीही कार्यालयीन/अनुशासनात्मक चौकशी प्रलंबित नसावी.
• उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास पाच हजार रूपयांचे राष्ट्रीय बचत पत्र (NSC) सिक्युरिटी डिपॉझिट स्वरूपात भरणे आवश्यक आहे.
• प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात परवाना देण्यात येईल. नंतर IRDAI ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराचा परवाना कायम करण्यात येईल व तो परवाना ५ वर्षासाठी वैध राहील.
• उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, परस्पर संवाद कौशल्य, जीवन विमा बाबतचे ज्ञान या आधारवर केली जाणार आहे.