इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला होणा-या निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्यामुळे आता महायुतीने आपल्या ९ जागा निवडून आणण्यासाठी रणनिती तयार केली आहे. त्यात तिन्ही पक्षांनी समन्वय राखण्यास प्राधान्य दिले आहे. तिन्ही पक्षांकडे असलेली पहिल्या आणि दुस-या पसंतीची मतं कशी द्यायची याबद्दल गणिते निश्चित करण्यात आली आहे. २०२२ मध्ये केलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती यावेळेस करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आराखडे तयार केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मतदानाचा पॅटर्न ठरवला जाणार आहे.
अगोदर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्हींकडून प्रयत्न करण्यात आले. पण, त्यात त्यांना यश आले नाही. विधान परिषदेच्या एका उमेदवारासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ५ जागा भाजप, २ शिंदेसेना तर २ जागा अजित पवार यांची राष्ट्रवादी लढवणार आहे. तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवले आहे.
या निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार आहे. त्यामुळे २३ च्या कोट्याप्रमाणे २०७ मते लागणार आहे. महायुतीकडे सध्या २०१ आमदारांचे बळ आहे. त्यात भाजप १०३, शिंदे सेना ३७, अजित पवार राष्ट्रवादी गट ३९, लहान पक्ष ९, अपक्ष १३ असे आमदार सोबत आहे. तर महाविकास आघाडीकडे ६७ आमदार आहेत. त्यात काँग्रेस ३७, राष्ट्रवादी शरद पवार १३, शिवसेना ठाकरे गट १५ आमदार आहे. त्यात शेकाप १ आणि १ अपक्ष अशी मते आहे. तीन उमेदवारांना २३ मतांप्रमाणे ६९ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन मते कमी पडू शकता. त्यात समाजवादीचे दोन आमदारांनी पाठींबा दिला तर महाविकास आघाडीचे तीन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात. या निवडणुकीत एमआयएम २ ,माकप १ यासह एका आमदार हे तटस्थ आहे.
महायुतीचे हे उमेदवार
भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेत तिकीट न दिलेल्या भावना गवळी व कृपाल तुमाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे हे उमेदवार
काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ऱाष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शेकापचे जयंत पाटील तर शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.