नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात धारदार कोयता घेवून फिरणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलीम उर्फ बाबा युसूफ शेख (रा.गुलशननगर,वडाळागाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. सलीम शेख याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीसांनी त्याच्याविरूध्द हद्दपारीची कारवाई केलेली आहे. दोन वर्षासाठी त्यास शहर आणि जिह्यातून हद्दपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
पोलीस त्याच्या मागावर असतांना रविवारी (दि.७) दुपारी तो वडाळागावात मिळून आला. अंगझडतीत त्याच्याकडे धारदार कोयता मिळून आला असून याबाबत अंमलदार सौरभ माळी यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत.