इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आमगव्हाण या गावातील सरपंचाचा पती, सासरा, उपसरपंच, ग्रामसेवक ३० हजाराच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. एकाच वेळी ग्रामपंचायतीमध्ये इतके जण लाच प्रकरणात सापडण्याचा हा पहिलाच प्रकार असावा.
या कारवावाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, कर वसूली करुन ग्रामपंचायतला रक्कम जमा न करता परस्पर वसुली केल्याबाबतचे प्रकरण मागे घेणे आणि नमुना नंबर १० पावती पुस्तकाबाबतचे प्रकरण मिटवून देण्यासाठी तक्रारदाराला ५० हजाराची लाच मागितली. यापैकी ३० हजाराची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ८ जुलै रोजी सरपंच सासरे यांना रंगेहात पकडले. त्यानंतर या प्रकरणात तिघांचा सहभागही समोर आला.
याप्रकरणी ग्रामसेवक राजेश विठ्ठलराव ठाकरे (५७), सरपंचाचे सासरे देविदास उर्फ दयाराम चरणदास मेहळा (मेहल्डे) (६३), सरपंच पती सतिश देवदास मेहळा (३१) व उपसरपंच देवेंद्र भिमराव कानोडे (३९) अशा चौघांवर मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.