इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – पुण्यातील एका मुलींच्या वसतिगृहाला आग लागली. सुदैवाने ही आग लवकरच आटोक्यात आली. मुलींना तातडीने बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही; परंतु शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयाचे तीन मजली मुलींचे वसतिगृह आहे. आज सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास या वसतिगृहातील पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीला आग लागली. अग्निशमन दलाची कसबा येथील व मुख्यालयातील पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. या जवांनांनी अगोदर आग लागलेल्या खोलीतील तीन मुलींना बाहेर काढले. इतर खोल्यांनाआग लागणार नाही, यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. दहा मिनिटांत आग आटोक्यात आली.
या खोलीत असलेल्या हीटरमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. या आगीत खोलीतील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर सर्व वस्तू जळाल्या. ताराचंद रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तिथे उपलब्ध असलेल्या १८ अग्निरोधक उपकरणांचा वापर करून आग शमवण्याचा प्रयत्न केला.