पुणे (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) – उपसंचालक भूमि अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्या अधिनस्त विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपीक टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी २८ एप्रिल २०२३ रोजी निवडसूची व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख यांच्या सूचनेनुसार विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षायादी प्रसिद्ध केली आहे.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख यांच्या २६ एप्रिल व १९ जून रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सुचनेनुसार ऑनलाईन परिक्षा निकालाच्या (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) आधारे प्रादेशिक निवड समितीने १७ ते २१ एप्रिल २०२३ या कालावधीत कागदपत्रे पडताळणी केली होती. त्यात पात्र ठरविलेल्या उमेदवारांकडून विभागातील उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून यापूर्वी प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील नेमणूक दिलेले व निवड रद्द करण्याबाबत विनंती केलेले उमेदवार वगळून विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षा यादी उपसंचालक भूमि अभिलेख, पुणे प्रदेश पुणे व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या कार्यालयाच्या बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती भूमी अभिलेखचे उपसंचालक अनिल माने यांनी दिली.