नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची आदलाबदल करीत भामट्याने वृध्दाच्या बँक खात्यातील रोकड हातोहात लांबविल्याची घटना बोधलेनगर भागात घडली. याघटनेत २९ हजाराची रोकडवर भामट्याने डल्ला मारला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वामन देवराम कटारे (७९ रा.समतानगर,टाकळीरोड गांधीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कटारे गेल्या २६ जून रोजी नाशिक पुणे मार्गावरील बोधलेनगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम बुथवर पैसे काढण्यासाठी गेले होते. या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात पैसे न निघाल्याने त्यांना पाठीमागे उभ्या असलेल्या इसमाने मदतीचा हात देत रोकडवर डल्ला मारला.
एटीएम कार्डच्या माध्यमातून पैसे काढत असतांना संशयिताने पीन नंबरची माहिती मिळवीत हा उद्योग केला असून हातचलाखीने कार्डची आदला बदल करीत त्याने कटारे यांच्या बँक खात्यातील २९ हजाराची रक्कम परस्पर लांबविली आहे. अचानक पैसे काढण्यात आल्याचे संदेश प्राप्त झाल्याने कटारे यांनी एटीएम बुथमधून मिनी स्टेटमेंट काढले असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.