इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रविवारी मध्यरात्री एका भरधाव कारने दोन पोलिसांना उडवल्याची घटना घडली. या अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी अंडरपास हॅरीस ब्रिजच्या जवळ रविवारी मध्यरात्री १.४० वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने गस्त घालत असलेल्या दोन पोलिसांना उडवले. त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. समाधान कोळी असे मृत पोलिसाचे नाव असून पी. सी. शिंदे या जखमी पोलिसावर उपचार सुरू आहेत. कोळी व शिंदे हे बीट मार्शल म्हणून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत असताना भरधाव वेगातील एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात कोळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर शिंदे जबर जखमी झाले. त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
शिंदे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या गंभीर आणि दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रुबी हॉलमध्ये जाऊन मृत पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, तर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची डॉक्टरांकडे विचारपूस केली.