नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड येथील हॉटेल गारवा बिर्याणी समोर मोबाईलवर बोलत अॅटोरिक्षाची प्रतिक्षा करणा-या तरूणीचा विनयभंग करीत दुचाकीस्वार भामट्यांनी मोबाईल हिसकावून नेला. या घटनेत सुमारे १० हजाराचा मोबाईल भामट्यांनी लंपास केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता आपली आई आणि मावस भावासमवेत शनिवारी (दि.६) जेवणासाठी नाशिकरोड भागात गेली होती. रात्री सव्वा दहाच्या सुमारास तरूणीसह आई व भाऊ जेवण आटोपून हॉटेल समोर अॅटोरिक्षाची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली.
अचानक तरूणी समोर येवून थांबलेल्या दुचाकीस्वार त्रिकुटापैकी एकाने तिचा विनयभंग केला तर दुस-याने मोबाईल हिसकावला. काही क्षणात दुचाकीस्वार भामटे बिटको चौकाच्या दिशेने फरार झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.