इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयएन) पुण्यातून आणखी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’चा हा दहशतवादी असून, त्याचे महमंद शाहनवाज आलम असे त्याचे नाव आहे. तो शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटकांचे सराव करण्याचे वर्ग घेत होता.
पुण्यातून यापूर्वी ‘इसिस मॉड्युल’ शी संबंधित सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. आलम हा अटक करण्यात आलेला आठवा दहशतवादी आहे. पूर्वी अटक करण्यात आलेल्या सात दहशतवाद्यांशी त्याचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. कोथरूडमध्ये यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आणि कोल्हापूर, पुणे परिसरात स्फोट घडवण्याचा सराव करण्यात आलेल्या दहशतवाद्यांशी त्याचा संपर्क होता, असे तपासात उघड झाले आहे. कोथरूडमध्ये दोन दहशताद्यांना जेव्हा अटक करण्यात आली, तेव्हा आलम पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. तो झारखंड राज्यातला आहे.
मोहमंद इम्रान खान आणि मोहमंद युनूस साकी यांच्यासह दुचाकी चोरीच्या प्रयत्नांत तो पकडला गेला होता. एनआयएच्या तपासात ते सर्व ‘इसिस’चे दहशतवादी होते, असे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर ‘एनआयए’ ने दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यापैकी तीन लाखांचे बक्षीस एकट्या आलमवर होते. ‘इसिस’चा अजेंडा पुढे नेण्यासाठी देशात दहशतवादी कृत्ये घडवण्याची त्यांची योजना होती. गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार फरतुल्ला गौरी आमि त्याचा जावई शाहीद फैसल यांच्या तो संपर्कात होता, अशी माहिती मिळाली. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’शी ते संपर्कात होते आणि पाकिस्तानच्या इशाऱ्यावर ते भारतात काम करीत होते.