मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबईत रात्री मोठा पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या शीव आणि कुर्ला परिसरात दोन ठिकाणी पाणी साचलेले असून प्रशासनामार्फत पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन तासात परिस्थिती सामान्य होईल, अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.
काल रात्री मोठा पाऊस झाल्याने मुंबईतील परिस्थितीबाबत निवेदन करण्याची सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली होती. त्यावेळी श्री. केसरकर यांनी सद्यस्थितीबाबत सभागृहात माहिती दिली.
पावसामुळे विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक बंद असून दोन तासात परिस्थिती सामान्य होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.