इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईत पावसाने थैमान घातले असून रात्रभर सुरु असलेल्या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली आहे. मुंबईत ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावासामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. तर सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबईच्या या अवस्थेवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे, ग्रीन कार्पेट टाकून नाले सफाई कामाची पाहणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पहिल्याच पावसाने त्यांच्या कामाची पावती दिली आहे. केंद्रापासून मुंबई महानगरपालिका पर्यंत यांचीच सत्ता आहे. तरी सुद्धा पहिल्याच पावसात मुंबई यांनी तुंबून दाखवली.
अशी विस्कळीत झाली रेल्वे सेवा
मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यायाने मुंबईतील विविध भागात पाणी साचले आहे. हिंदामाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला, हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणीच पाणी झाले आहे.पावसाचा रस्ते वाहतूक आणि लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. कुर्ला, अंधेरी, सांताक्रुझमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून कल्याणपासून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतो आहे. मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर झालेला दिसून येत आहे. ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. ठाण्याकडून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यादेखील रद्द करण्यात आले आहे. पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन रद्द करण्यात आली आहे.