इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लडाखः सीमेवर आपल्या नापाक कारवाया करण्यापासून चीन परावृत्त होत नाही. पूर्व लडाखमधील पँगॉन्ग तलावाच्या परिसरात चिनी सैन्य दीर्घकाळापासून खोदकाम करत आहे. याच भागात चिनी लष्करी तळदेखील आहे. तिथे शस्त्रे, इंधन आणि चिलखत वाहनांसाठी निवारा ठेवता यावा यासाठी भूमिगत बंकर बांधण्यात आले आहेत. पँगॉन्ग तलावाजवळ चीनच्या हालचाली वाढण्याची ही पहिलीच वेळ नाही.
चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) चा सिरजाप लष्करी तळ पँगॉन्ग तलावाच्या उत्तरेकडील पर्वतांच्या मध्यभागी आहे. तलावाभोवती तैनात असलेल्या चिनी सैनिकांचे हे मुख्यालय आहे. भारताचा दावा असलेल्या भागावर चीनने हा लष्करी तळ बांधला आहे. हा लष्करी तळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. मे २०२० मध्ये ‘एलएसी’वरील स्टँडऑफ सुरू होईपर्यंत या भागात मानवांची वस्ती नव्हती.
सॅटेलाइट इमेजेसची नोंद ठेवणाऱ्या अमेरिकन कंपनी ‘ब्लॅक स्काय’च्या माध्यमातून शेअर करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये सिरजाप मिलिटरी बेसवर भूमिगत बंकर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांचा वापर शस्त्रे, इंधन आणि इतर साहित्य ठेवण्यासाठी केला जात आहे. सिरजाप तळ २०२१-२०२२मध्ये बांधण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून चीनने सीमेवर स्वत:ला मजबूत करण्याचे काम सातत्याने केले आहे. ‘एलएसी’च्या दुसऱ्या बाजूला रस्तेही बांधले आहेत. तीस मे रोजी घेतलेल्या छायाचित्रात, एका मोठ्या भूमिगत बंकरचे आठ उतार असलेले प्रवेशद्वार स्पष्टपणे दिसत आहेत. त्याचप्रमाणे, मोठ्या बंकरजवळ आणखी एक लहान बंकर आहे. तिथे पाच प्रवेशद्वार दिसतात. मुख्यालयासाठी अनेक मोठ्या इमारतींव्यतिरिक्त, लष्करी तळांवर कायमस्वरुपी निवारे किंवा बंदिस्त पार्किंगदेखील आहे. तिथे चिलखती वाहने ठेवली जाऊ शकतात. हे आश्रयस्थान हवाई हल्ल्यापासून वाहनांचे संरक्षण करण्यासाठीही असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीनचा लष्करी तळ रस्ते आणि खंदकांच्या जाळ्याशी जोडलेला आहे.
‘ब्लॅकस्काय’ विश्लेषकाने सांगितले, की लष्करी तळावर मोठ्या प्रमाणात चिलखती वाहन साठवण सुविधा, चाचणी श्रेणी, इंधन आणि शस्त्रे साठवण्याच्या इमारती आहेत. सध्या लष्करी तळावर तोफखाना आणि इतर शस्त्रे आहेत. ते रस्ते आणि खंदकांच्या मोठ्या नेटवर्कने जोडलेले आहेत. गरज पडल्यास ही शस्त्रे आणि तोफगोळे सीमेवर आणता येतील. आश्चर्य म्हणजे हे रस्ते सॅटेलाइट इमेजमध्येही दिसत नाहीत. गलवान खोऱ्यातील संघर्ष क्षेत्राच्या दक्षिण-पूर्वेला १२० किलोमीटर अंतरावर चीनचा लष्करी तळ आहे. याबाबत भारतीय लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पँगॉन्ग लेकच्या आसपासच्या परिसरात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या माजी कमांडरने सांगितले, की चीनने बांधलेले भूमिगत बंकर लष्करी दृष्टिकोनातून बांधले गेले आहेत. ते म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत उपग्रहाद्वारे किंवा हवाई निगराणीद्वारे सर्वकाही शोधले जाऊ शकते. बंकरशिवाय शस्त्रे आणि साठवण सुविधांना हवाई हल्ल्याद्वारे लक्ष्य केले जाऊ शकते. चीन तेथे खोदकाम करण्यास सक्षम नाही.