इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एकदा मी रशियामध्ये गेलो, केंद्र सरकारमध्ये मी मंत्री होतो. तिथल्या राजदूतांनी काही लोकांना संध्याकाळी माझ्याबरोबर विचार विनिमय करायला बोलावलं. तिथली एक रशियन बाई माझ्याशी मराठीत बोलली, मला गंमत वाटली. त्या राजदूतांना मी सांगितलं त्या नुसत्या मराठीत बोलत नाहीत त्या वर्षातून एकदा पंढरीची वारी करतात. पंढरीची वारी करायला एक रशियन बाई जाते, त्या बाईचं मला कौतुक वाटलं असे शरद पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पुढच्या वारीच्या वेळेला त्या आल्या मी त्यांना पुण्यामध्ये माझ्या घरी बोलावलं. मध्यम वर्गातील काही भगिनींना देखील मी बोलावलं. त्यांची आणि या रशियन बाईंची ओळख होत गेली मी त्या सगळ्यांना सांगितलं ही भगिनी वारीला जाते. मध्यमवर्गीय भगिनींपैकी एकीने विचारलं तुम्ही वारीला जाता? ते म्हटले हो. कुठून जाता? पुण्यातून जाता की सासवड मधून जाता? की आणखी कुठून जाता? त्या रशियन बाईंनी उत्तर मोठ्या गमतीचे दिलं. वारी ही सासवडपासून, बारामतीपासून निघत नाही. तुकोबांचे दर्शन घेऊन शेवटी पंढरीला पोहोचते त्याला वारी म्हणतात, मध्ये जे येतात त्याला हौशे- नौशे म्हणतात. मी काही हौशे- नौशे नाही मी खऱ्या अर्थाने वारकरी आहे हे रशियन बाई सांगत होती.
याचा अर्थ हा विचार जगाच्या पातळीवर पोहोचण्याच्या संबंधीचा काम अनेक संतांनी केलं आणि त्याची नोंद जगातल्या अनेक देशांमध्ये घेतली गेली. त्याच दृष्टिकोनातून एक वेगळी भूमिका कुठेही खोटेपणा नाही, धार्मिकपणा नाही. स्वच्छ विचार, आधुनिक विचार ज्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. ती गरज ओळखून श्यामसुंदर महाराज आणि त्यांचे सहकारी अखंडपणाने हे काम करत आहेत. मला खात्री आहे की त्यांच्या विचारप्रसारातून एक प्रकारची नवीन प्रागतीक विचारांची पिढी तयार होईल. समाजासमोरचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची उपयुक्तता राहील. त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. एका चांगल्या भूमिकेने तुम्ही काम करत आहात त्याची नोंद महाराष्ट्राच्या संस्कृती आणि सामाजिक विचारांमध्ये केली जाईल याच्याबद्दलची खात्री बाळगतो.