इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः भाजपने मराठा समाजाविरोधात घेतलेली भूमिका चुकीची होती. अत्यंत खालच्या पातळीवरून टीका केल्याने त्याचा फटका लोकसभेत बसला. आता किमान सगेसोयरे अंमलबजावणीचा निर्णय घेतला, तर ठीक; अन्यथा लोकसभेप्रमाणे फटका बसू शकतो, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी केले. त्यावर आता चांगलीच राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात ‘चारसो पार’ आणि राज्यात ‘४५ प्लस’च्या गप्पा मारत होतो. दुधाने तोंड पोळले आहे. विधानसभेला ताकसुद्धा फुंकून प्यावे लागेल, अन्यथा विधानसभेला मोठा फटका बसू शकतो, असा इशारा खोतकर यांनी दिला आहे.
सगेसोयरे अधिसूचनेची १३ तारखेपर्यंत अंमलबजावणी झाली नाही, तर विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर सरकारचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात खोतकरांनी घरचा आहेर दिला आहे.