इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : काँग्रेसने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले असून अर्जासोबत पक्षनिधीचील मागणीही करण्यात आली आहे. उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीने शहर, सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार हे पत्र पाठवण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे. आमदारपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वीस हजार रुपये पक्षनिधी द्यावा लागणार आहे.
प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात इच्छुकांना ऑगस्टपर्यंत आपले अर्ज जमा करावे लागणार आहेत. अर्जासोबत सर्वसाधारण उमेदवारांना पक्षनिधी म्हणून वीस हजार रुपये, तर अनुसुचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांना दहा हजार रुपये पक्षनिधी भरावा लागेल. महाविकास आघाडीत लढायचचे ठरलेले असतानाही काँग्रेसचे ‘प्लॅन बी’वर काम सुरू आहे. इच्छुक उमेदवारांकडून घेण्यात येणाऱ्या पक्षनिधीवरून वाद होणार आहे.
विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. पटोले यांच्या निर्देशावरून या निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागले जात आहेत. पक्षनिधी म्हणून रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नावे डी. डी. द्वारे प्रदेश कार्यालयाकडे किंवा जिल्हा काँग्रेस समितीकडे जमा करायचे आहेत.