नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाहन उद्योगाच्या क्षेत्रात जपानने चांगली प्रगती केली आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत भारताने जपानला मागे टाकले असून भारतातील वाहन उद्योगातील उलाढाल ७ लाख कोटींवरून २० लाख कोटींवर पोहचली आहे. येत्या काळात ही उलाढाल ५० लाख कोटींवर पोहचविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार केले.
बुटीबोरी एमआयडीसी येथे होरिबा कंपनीच्या वैद्यकीय उपकरण आणि कंज्युमेबल्स (रिएजंटस) उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, होरिबा लिमिटेडचे चेअरमन आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुशी होरिबा, होरिबा इंडियाचे चेअरमन डॉ. जय हाकू, होरिबा इंडियाचे अध्यक्ष डॉ. राजीव गौतम यांची उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, ‘विदर्भ हा आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागास भाग आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. येथील गरीबी हटविण्यासाठी रोजगार निर्मिती आवश्यक आहे. सेमी कंडक्टरचा प्रकल्प आल्यास नक्कीच रोजगार निर्मिती होईल.’ बुटीबोरी येथे ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. भारतातून जवळपास ४० हजार कोटींची निर्यात सुरू असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
‘शेतकऱ्याने पारंपरिक शेती न करता ऊर्जादाता, इंधनदाता बनावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला बऱ्याच अंशी यश मिळाले आहे. इथेनॉलचा एक पर्यायी इंधन म्हणून उपयोग होत आहे. हायड्रोजन हे नवे इंधन भारताचे भविष्य आहे. आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे,’ असेही गडकरी म्हणाले. ‘राज्यात सेमिकंडक्टरचा प्रकल्प यावा यासाठी काही कंपन्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे. होरिबाने वैद्यकीय उपकरण आणि कंज्युमेबल्स उत्पादन प्रकल्प अत्यंत वेगाने सुरू केला. त्यामुळे त्यांनीच आता सेमिकंडक्टरचा प्रकल्प सुरू करावा. त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य राज्य सरकारद्वारे करण्यात येईल,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.