इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे सुरु केलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांनी २ जानेवारीपर्यंत मुदत दिली.
यावेळी त्यांनी दिलेली ही वेळ आता शेवटची असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी त्यांनी वेळ घ्या पण, आरक्षण द्या असेही सांगितले. या शिष्टमंडळात निवृत्त न्यायमूर्ती एम.जे. गायकवाड, सुनील शुक्रे, उद्योगमंत्री उदय सामंत, धनजंय मुंडे यांच्यासह नेते उपस्थितीत होते.
मनोज जरांगे पाटील यांनी य़ाअगोदर उपोषण केल्यानंतर सरकारला निर्णय घेण्यासाठी ४० दिवसाची मुदत दिली होती. ती पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांना उपोषण करु नये यासाठी फोन केला. पण, त्यांनी सरकारला दिलेली मुदत संपली असल्याचे सांगत त्यांना नकार दिला.
पण, आता त्यांनी सरकारला पुन्हा दोन महिन्याचा वेळ दिला आहे. या दोन महिन्यात जर आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचे सांगितले.