सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– संपूर्ण बागलाण तालुक्यासह परिसरात खळबळ उडविणारी मोठे साकोडे येथील सामुहिक आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून घटनेच्या २४ तासानंतर सर्व मृतदेहांवर मुळगाव साकोडे येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात अंतिम संस्कार करण्यात आले.
मयत सरला देशमुख हिच्या माहेरच्या लोकांनी सरलाचा मृत्यू नसुन घातपात असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे कालपासून तणावपूर्ण वातावरण असून सरलाचे माहेर असलेले मळगाव (पिसोरे) येथील सर्वच नातेवाईक ग्रामस्थ हे साकोडे व बुंधाटे येथे जमा झाल्याने मोठी गर्दी या घटनेमुळे जमा झाली होती. आज सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान मयत सरला देशमुख, व तिघे मुलींचे मृतदेह साकोडे येथे आणण्यात आले.
पोलिसांनी खबरदारी म्हणुन आधीच अतिरिक्त पोलीस कुमक मागवत साकोडे गावात काही अनुचित प्रकार घडणार नाही. याची खबरदारी घेतली होती मृत सरला च्या सासरच्या लोकांच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आले होते. माहेरच्या लोकांनी जो पर्यत सासरचे लोकांवर गुन्हा दाखल होत नाही. तो पर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी केलेली मध्यस्थी व स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने अंतिम संस्कार करण्यात आले. मयत सरलाचा पती, तुकाराम विठ्ठल देशमुख, सासरे विठ्ठल देशमुख आणि दिर या तिघांना चौकशी कामी ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत घटनेची चौकशी करत आहेत.