नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी एकाच इमारतीतील दोन घरे फोडून घरातील ऐवजावर डल्ला मारला. हा प्रकार नाशिकरोड येथील दत्तमंदिर रोड भागात घडला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उध्दव दिनकर हांडोरे (रा.विहीतगाव,नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. हांडोरे यांचे बहिण मेव्हणे दत्तमंदिर रोडवरील मिहीर को.ऑप सोसायटीत वास्तव्यास असून ते गेल्या काही दिवसांपासून बाहेरगावी गेले आहे. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.३) रात्री हांडोरे यांच्या मेव्हण्यांचे व त्यांचे शेजारी राहणा-या ममता तानाजी हांडोरे यांची बंद घरे फोडून कपाटात ठेवलेल्या रोकडसह सोन्याचांदीचे अलंकार पळवून नेले.
ममता हांडोरे या अद्याप दाखल न झाल्याने त्यांच्या घरातील किती ऐवज लंपास झाला याबाबत अद्याप उलगडा होवू शकला नसून हांडोरे यांच्या मेव्हण्यांच्या घरातील २५ हजाराच्या रोकडवर प्रथमदर्शनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वायकर करीत आहेत.