नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहन खरेदी विक्रीत मायलकाने एकास पाच लाखास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जुन्या कारच्या मोबदल्यात इनोव्हा कार खरेदी करून देण्याच्या मोबदल्यात हा अपहार झाला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष दिनकर आगळे व अलका दिनकर आगळे (रा.मोंढेनगर,वडाळा पाथर्डी रोड) अशी वाहनधारकाची फसवणुक करणा-या संशयित मायलेकाचे नाव आहे. याबाबत प्रशांत सुकलाल लोहार (रा.केतकीनगर,म्हसरूळ शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे परिचीत असून संशयितांनी गेल्या वर्षी लोहार यांची एमएच १५ डीएस ४६०९ कार विक्री करून एमएच १५ सीडी ९२७० ही इनोव्हा कार खरेदी करून देण्याचे आमिष दाखविले होते. ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२३ मध्ये याबाबत बोलणी करून लोहार यांची कार साडे चार लाख रूपयात विक्रीसाठी ताब्यात घेतली होती. यावेळी वाहनाचे मुळ कागदपत्रही संशयित आगळे याच्या स्वाधिन करण्यात आले होते.
त्यानंतर संशयिताने दाखविलेल्या इनोव्हा कारच्या खरेदीसाठी ३६ हजारही संबधीताने स्विकारले होते. मात्र बराच काळ उलटूनही विक्री केलेल्या कारची रक्कम अथवा इनोव्हा कार खरेदी करून न दिल्याने लोहार यांनी तगादा लावला असता संशयिताने आई अलका आगळे यांच्या नावे असलेले अॅक्सीस बँकेच्या अंबड शाखेचा सदर रकमेचा धनादेश दिला. मात्र सदरचा धनादेश न वटता परत आल्याने लोहार यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.