इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वाहतूक विभागाच्या विश्रामबाग कार्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी संजय फकीरा साळवे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी दारु पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय आल्याने त्याला ब्रीद एनालायझर टेस्टसाठी विश्रामबाग कार्यालयात आणले होते. त्यावेळी त्याने पोलिसांशी वाद घातला व पेटवून देण्याचा प्रयत्न केला. एपीआय शैलेजा स्वरुप जानकर यांच्यासोबत हा प्रकार घडला. सुदैवाने आरोपीच्या हातातील लायटर पेटू न शकल्याने पुढील दुर्घटना टळली.
या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, पुण्यातील प्रचंड वर्दळीच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या जवळच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ड्रंक ॲंड ड्राईव्हची कारवाई सुरु असताना ही घटना घडली. हे कृत्य अतिशय संतापजनक आहे.
थेट पोलीसांवर हात टाकेपर्यंत गुन्हेगार या राज्यात निर्ढावले आहेत. एकिकडे अशा घटनांमुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होत असून दुसरीकडे सर्वसामान्य माणूस भीतीच्या सावटाखाली जगतोय ही सत्य परिस्थिती आहे. गृहमंत्री महोदय, पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पोलीसांवरील हल्ला ही अतिशय गंभीर बाब आहे. याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण द्यावेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही.