मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकरांवर भूखंड घोटाळा प्रकरणात दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांनी रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. EOWच्या प्रमुखांवर खटला दाखल करायला हवा, त्यांनी वायकरांना मनस्ताप दिला. त्या अधिका-यांवर गुन्हे दाखल करा असे आव्हान संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना दिले आहे.
यावेळी ते म्हणाले की, आम्ही आणखी काय अपेक्षा करू शकतो, आता फक्त दाऊदला क्लीन चिट द्यायचे बाकी आहे. हे सरकारर महाराष्ट्रातील असो किंवा दिल्लीतील ओवाळून टाकलेले सर्व भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतात. त्यानंतर आमची ताकद किती वाढली हे दाखवतात. या सर्वांवर भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी, सीबीआयचे खटले दाखल केले. त्यात वायकरही आहेत. वायकर घाबरुन पळून गेले.
आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र अपूर्ण माहिती आणि गैरसमजाच्या आधारे तक्रार दाखल केली असेल तर त्या प्रमुखावर कारवाई करावी, अशी माझी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे.