मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकरांवर यांच्यावर भूखंड घोटाळा प्रकरणात दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांनी रद्द केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत टीका केली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांच्या गैरसमज कारभाराची महाराष्ट्रातील जनतेला ‘ योग्य समज ‘….ऐका हो ऐका, आणखी एका ‘पलटी मार‘ नेत्याला क्लीन चिट देऊन स्वच्छ करून घेण्यात आले आहे! मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या तक्रारीतून रवींद्र वायकरांवर दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांनी रद्द केला आहे.
भूखंड घोटाळा प्रकरणात गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. गैरसमजातून गुन्हे दाखल होतात, ही बाब पहिल्यांदाच महाराष्ट्राला कळाली, इतक्या उच्च प्रतीचे काम पोलिस करत आहे हा ही विक्रम महायुती सरकारच्या काळातच झाला आहे , हे विशेष!
गैरसमजातून असे अजून कोणते गुन्हे दाखल झाले आहेत, गैरसमजातून असे अजून किती गुन्हे मागे घेण्यात येणार, गैर समजातून फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल होतात का? गैरसमजातून गुन्हे दाखल करण्याची समज पोलिसांना कोणी दिली? पोलिसांचा गैरसमज होत असला तरी महाराष्ट्रातील जनतेला भ्रष्ट भाजपच्या ‘वॉशिंग मशीन‘ ची समज योग्य प्रकारे आहे.