नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ग्रामिण पोलीस दलाच्या आडगाव येथील अधिक्षक कार्यालयात एका मद्यधुंद पोलीसांनी राडा केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. गेल्या दोन महिन्यापूर्वीही या कर्मचा-याने मद्याच्या नशेत शिवीगाळ करीत कार्यालयात गोंधळ घातला होता. त्यामुळे त्याच्याविरूध्द निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने ही घटना घडली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दारूबंदी आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरजील भिकाजी गायकवाड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ग्रामीण मुख्यालयात नेमणुकीस असलेला संशयित अंमलदार गायकवाड याची सुरगाणा पोलिस ठाण्यात नियुक्ती आहे. अचानक व पूर्व परवानगी न घेताच तो काही महिन्यांपासून तो कर्तव्यावर गैरहजर होता. गेल्या २३ मार्च २०२४ रोजी त्याने मद्यधुंदावस्थेत अधीक्षक कार्यालयात आरडाओरड करीत गोंधळ घातला होता. त्यानंतर त्याच्याविरुद्ध आडगाव पोलिसांत गुन्हा नोंदवून त्याला निलंबित करण्यात आले.
दरम्यान, ४ जुलै २०२४ रोजी दुपारी साडेचार वाजता गायकवाड याने पुन्हा तसाच प्रकार केला. मद्याच्या व्यसनामुळे तो सातत्याने कर्तव्यावर गैहजर राहत असल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली. त्यामुळे त्याचे वेतन अधीक्षक कार्यालयाने काही महिन्यांपासून रोखले आहे. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गायकवाड कार्यालयात गेला होता. माझे वेतन का रोखले, असा प्रश्न विचारत त्याने गोंधळ घातला.