इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरः कॅन्सर पीडित पत्नीच्या उपचारासाठी केरळ राज्यातून नागपूरला आलेल्या एका दाम्पत्याने १२ वर्षीय मुलीला विष देऊन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जरीपटका पोलिस ठाणे हद्दीतील विजयश्रीनगर येथे ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये दाम्पत्याचा मृत्यू झाला असून मुलगी बचावली आहे. तिच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
रीजू विजयन उर्फ विजय नायर आणि प्रिया रीजू नायर असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. आत्महत्या प्रकरणाचा जरीपटका पोलिस तपास करत आहेत. प्रिया यांना रक्ताचा कर्करोग या दुर्धर आजाराने ग्रासले होतं. रीजू यांनी प्रियावर केरळ येथील रुग्णालयात उपचार केले; मात्र उपचारात फारसा फायदा होत नसल्यामुळे ते पत्नी प्रिया आणि मुलगी वैष्णवीला घेऊन नागपूर शहरात आले. दोन महिन्यांपासून नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दर आठवड्यात हजारो रुपयांचा खर्च लागत असल्याने रीजू आर्थिक विवंचनेत होते.
पत्नीच्या उपचारात जवळील सर्व जमा पैसे संपल्यनंतर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेण्यासाठीही पैसे शिल्लक नसल्याने रीजूने पत्नी आणि मुलीला शीतपेयातून विष दिले आणि स्वतः विषयुक्त शीतपेय पिऊन आत्महत्या केली; मात्र वैष्णवी बचावली आहे. वैष्णवीने कोल्डड्रिंक पिल्यानंतर काही वेळात तिला उलट्या झाल्या. त्यामुळे पोटात गेलेले विष बाहेर पडून आणि ती बचावली. तिच्यावर नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. प्रिया नायर यांच्या आधारकार्डवर कोल्हापूरचा पत्ता आहे.