नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्यरात्रीच्या सुमारास गंजमाळ परिसरातील पंचशीलनगर येथे तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. पांडुरंग हनुमंत शिंगाडे (वय १९, रा. पंचशीलनगर, गंजमाळ, जि. नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग शुक्रवारी रात्री घरात झोपला असताना पहाटे २.३० वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला करीत डोक्यात व छातीत वार केले. या हल्ल्यात शिंगाडे गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग शिंगाडे सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तो दोनदा तडीपारही झाला होता. हल्लेखोर त्याच्या ओळखीचा असून, जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्येप्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत
पोलिसांकडून हल्लेखोरांची नावे निश्चित करण्यात आली असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. शहराच्या मध्यवस्तीत ठिकाणी पंचशीलनगर भरवस्तीत खुनाचा प्रकार घडल्याने परिसरात दहशत पसरली आहे.









