इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथे शालेय राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १४ वर्षे मुले- मुली, १७ वर्षे मुली आणि १९ वर्षे मुले या चार वयोगटाचा समावेश असून स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सर्व गटांचे उपांत्य सामने खेळविले गेले.
या चारही गटांच्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर विभागाच्या संघानी सुंदर खेळाचे प्रदर्शन करत तीन गटात उपांत्य सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. १४ वर्षे मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर संघाने यजमान नाशिकवर २५ – ०४ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. मात्र १४ वर्षे मुलांच्या सामन्यात कोल्हापूरला संभाजीनगर संघाकडून अवघ्या एक गुणांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या उपांत्य सामन्यात फारच चुरस दिसून आली. पहिल्या सत्रात कोल्हापूरने ९-७ अश्या दोन गुणांची आघाडी घेत चांगली सुरवात केली.
दुसऱ्या सत्रातही कोल्हापूरच्या खेळाडूंनी चांगला खेळ करून ही आघाडी टिकवून ठेवण्यात यश मिळवले. तिसऱ्या सत्रात मात्र संभाजी नगरच्या खेळाडूंनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय साधून २२-२० अशी आघाडी मिळविली. चवथा सत्रात कोल्हापूरने चांगली सुरवात करून २४-२४ अशी बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल याची उत्कंठा लागून राहिली. सामना संपण्याच्या दोन मिनिटे आधी कोल्हापूरकडे ३२-३१ अश्या एक गुणांची आघाडी होती. मात्र शेवटच्या मिनिटात संभाजीनगरच्या महंमदअली शेख याने सुंदर चाल रचून बास्केट टाकत हा सामना ३३-३२ अश्या अवघ्या एक गुणांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. कोल्हापूरकडून प्रसन्न हिरे ( १२ गुण) आणि शार्दूल कदम (१० गुण) यांनी चांगले शर्थीचे प्रयत्न केले. या गटातील दुसरा उपांत्य सामनाही चांगला रंगला.या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुणे संघाने मुंबईवर ३८ – ३३ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
मुलींच्या १७ वर्षे वयोगटात कोल्हापूर संघाने आपल्या पराभवाचा बदला घेत या उपांत्य सामन्यात संभाजीनगर संघाला ४४ – १८ अश्या मोठ्या फरकाने पराभूत करून अंतिम फेरी गाठली. १९ वर्षे मुलांमध्ये पुन्हा एकदा कोल्हापूर विभागाच्या संघाने उपांत्य सामन्यात संभाजीनगर संघावर ७१ – ६२ अश्या नऊ गुणांनी पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. या गटाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई संघाने पुणे संघावर ४१- २८ अश्या तेरा गुणांच्या फरकाने पराभव करून अंतिम फेरी गाठली.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे उत्कृष्ट खेळाडूंची प्राथमिक निवड केली जाणार आहे. तसेच प्रत्येक विभागातून थेट निवड चाचणीसाठी निवड झालेले खेळाडू यां सर्वांची उद्या निवड चाचणी घेतली जाणार आहे. या निवड चाचणी मधून उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती आयोजकांनी दिली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील, स्पर्धा प्रमुख राजेश क्षत्रिय, राज्य प्रतिनिधी शत्रुघ्न गोखले, वासुदेव थेटे, जयंत देशमुख, मुद्रा अग्रवाल, जिल्हा सचिव जकिर सय्यद, क्रीडा अधिकारी अरविंद चौधरी, संदीप ढाकणे, महेश पाटील, भाऊसाहेब जाधव, क्रीडा प्रशिक्षक अरविंद खांडेकर, चित्रा उदार आणि सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
आजच्या स्पर्धेचे निकाल :
१४ वर्षे मुले – उपांत्य सामने –
१) संभाजीनगर विजयी विरुद्ध कोल्हापूर ( ३३-३२)
२) मुंबई विजयी विरुद्ध नाशिक (४० – १३)
१४ वर्षे मुली – उपांत्य सामने
१) कोल्हापूर विजयी विरुद्ध नाशिक ( २5 – ०४)
२) पुणे विजयी विरुद्ध मुंबई ( ४० – २९)
१७ वर्षे मुली – उपांत्य सामने
१) कोल्हापूर विजयी विरुद्ध संभाजीनगर (४४ – १८)
२) मुंबई विजयी विरुद्ध पुणे( ३८ -३३)
१९ वर्षे मुले – उपांत्य सामने –
१) कोल्हापूर विजयी विरुद्ध संभाजीनगर (७१ – ६२)
२) मुंबई विजयी विरुद्ध पुणे( ४१ -२८)
होणारे अंतिम सामने –
१४वर्षे मुले – संभाजीनगर विरुद्ध मुंबई
१४वर्षे मुली – कोल्हापूर विरुद्ध पुणे
१७वर्षे मुलीं- कोल्हापूर विरुद्ध पुणे
१९वर्षे मुले – कोल्हापूर विरुद्ध मुंबई