सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण तालुक्यातील मोठे साकोडे येथील सरला तुकाराम देशमुख(३०) हिने आपल्या तीन मुली संध्या तुकाराम देशमुख (७), मनश्री तुकाराम देशमुख (६), वेदश्री तुकाराम देशमुख (१वर्ष ६ महिने) यांचेसह साकोडे शिवारातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सरलाने आपल्या तिघा मुलींसह आत्महत्या का केली? याचे कारण रात्री उशिरा पर्यंत समजू न शकले नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मोठे साकोडे येथील रहिवासी असलेले तुकाराम विठ्ठल देशमुख हे शेती व्यवसायनिमित्त मोठे साकोडे फाट्यावरील मळ्यात राहतात काल दिनांक ४ जुलै रोजी पत्नी सरला व मुली घरातून अचानक कुठे गेल्या याचा शोध पती तुकाराम याने घेण्याचा प्रयत्न केला. सरलाचे माहेर असलेल्या मळगाव(पिसोरे)येथे रात्री तिचा पती तुकाराम याने तपास केला असता तिथे ही सरला व मुली मिळून आल्या नाही. आज सकाळी परत शोधत असतांना, साकोडे शिवारात विहीर असलेले विहीर मालक शिवाजी भाऊपाटील ठाकरे यांच्या आरम नदी काठावरील विहिरीत एका मुलीच्या मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत त्यांनी साकोडे पोलीस पाटील नंदन देशमुख यांना माहिती दिली असता गावातील महिला सरला देशमुख व मुलींचा शोध घेणारे तुकाराम देशमुख यांना विहिरीजवळ बोलावले असता मोठी मुलगी संध्याचा मृतदेह असल्याची खात्री झाली.
त्यानंतर मुलींसह सरलाचा मृतदेह मिळून आला. याबाबत सटाणा पोलिसांना पोलीस पाटील नंदन देशमुख यांनी माहीती देत घडलेली घटना सांगितली. घटनेचे गंभीर्य ओळखत मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व सटाणा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. चार ही मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी नेण्यात आले. याबाबत सटाणा पोलिसात प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत अधिक तपास करीत आहेत .