नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गंगापूररोडवरील खतीब डेअरी जवळ तरूणीशी मैत्रीचे संबध ठेवण्याच्या वादातून त्रिकुटाने दोघा भागीदारांना मारहाण करीत एका व्यावसायीकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या घटनेत व्यावसायीक जखमी झाला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम काजळे व त्याचे दोन साथीदार अशी व्यावसायीकावर प्राणघातक हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत अक्षय विकास बढे (३३ रा.कर्मयोगीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बढे व त्यांचे भागीदार अक्षय निकम हे दोघे बुधवारी (दि.३) रात्री खतीब डेअरी परिसरातील डुडूस कॅफे या हॉटेलमध्ये बसलेले असतांना ही घटना घडली.
संशयित त्रिकुटाने व्यावसायीक भागीदार असलेल्या दोघा मित्रांना गाठून तरूणीशी मैत्रीचे संबध ठेवण्याच्या कारणातून वाद घातला. यावेळी संतप्त त्रिकुटाने बढे यांना शिवीगाळ करीत त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. तर निकम हे आपल्या मित्राच्या मदतीस धावून गेले असता संशयितांनी त्यांनाही लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.