इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस नेते राहुल गांधी यंदा प्रथमच आषाढी वारीत सहभागी होणार असताना त्यांना भाजपने विरोध केला आहे. निवडणूक डोळ्यापुढे ठेवून भोळ्याभाबड्या वारकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी राहुल वारीत सहभागी होणार असतील, तर आम्ही त्याचा निषेध व विरोध करतो, असे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हटले आहे.
राहुल येत्या १४ जुलै रोजी आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन ते संत ज्ञानेश्वर व संत तुकाराजांच्या पालख्यांचे दर्शन घेणार आहेत. ते सर्वसामान्य वारकऱ्यांसारखे वारीत पायी चालणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी दिली. या पार्श्वभूमीवर निंबाळकर यांनी त्यांच्या वारीतील सहभागाला विरोध केला आहे. राहुल यांनी पालखी सोहळ्यात कॅटवॉक करू नये. राहुल व शरद पवार यांनी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पालख्यांचे दर्शन घ्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. राजकारणासाठी त्यांनी पालखी सोहळ्यात पायी चालू नये, असे निंबाळकर यांनी म्हटले असून राहुल यांनी उभ्या आयुष्यात विठ्ठल, माउलींचे दर्शन घेतले नाही; पण आता निवडणूक डोळ्यापुढे ठेवून वारकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी पालखी सोहळ्यात राहुल पायी चालणार आहेत, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालखी मार्ग तयार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर, पुणे, आळंदीसाठी दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी दिला; पण आम्ही त्याचा राजकारणासाठी वापर केला नाही. राजकीय मंडळींनी आतापर्यंत केव्हाच पालखीमध्ये राजकीय शोबाजी करण्याचे काम केले नाही; पण आता राजकीय पक्ष निवडणुकीत वारकऱ्यांचा फायदा घेण्याचे काम करत आहेत, असेही निंबाळकर यांनी या वेळी म्हटले आहे.