इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाने सातपुर येथील नारंग कोल्ड स्टोरेज येथे धाड टाकुन तपासणी केली असता त्या ठिकाणी कुठलेही लेबल नसलेल्या, मार्च २०२३ पासून साठविलेल्या मिरची पावडर १०१०८ किलो किंमत १६ लाख ६७ हजार ८२० रुपये व धने पावडर ४,२७८ किलो किंमत २ लाख ३५ हजार २९० रुपये इतका साठा भेसळीच्या संशयावरुन अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत नमुने घेऊन जप्त केला.
या कारवाईबाबत एफडीएने दिलेली माहिती अशी की, सदरचा साठा हा मे. जे. सी. शहा अॅण्ड कंपनी, १३, ईश्वर रेसीडेंसी, द्वारका, नाशिक या पेढीचा असून सदर प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठविण्यात येत असून अहवाल आल्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही घेण्यात येईल. सदरची कार्यवाही ही अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी सह आयुक्त नाशिक विभाग, सं.भा. नारागुडे तसेच सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड, मनिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाने दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर भेसळयुक्त अन्न पदार्थावर कार्यवाही घेण्याबाबतची मोहिम हाती घेतली आहे. जनतेस दर्जेदार व भेसळीरहीत अन्न पदार्थ मिळावे यासाठी ही मोहिम आहे. या कारवाईबरोबरच प्रशासनातर्फे जनतेस अवाहनही केले आहे. भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात तक्रार तसेच काही गोपनिय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरीत टोल फ्रि क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा.