नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिलेवर चाकू हल्ला करीत दुचाकी जाळणा-या त्रिकुटाविरूध्द अखेर पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२) पहाटेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नासह आर्म अॅक्टनुसार गुन्हा दखाल करण्यात आला आहे.
हर्षल वणवे व त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत संगिता बारकू चांगले (रा.रामसृष्टी अपा.स्वामी विवेकानंदनगर मखमलाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. चांगले या मंगळवारी (दि.२) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुलास शिकवणीस सोडण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली होती. इमारतीच्या पार्किंगमध्ये संशयित त्यांच्या बहिणीची मोटारसायकल उचलून घेवून जात असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड करीत रोखण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला.
यानंतर संशयित त्रिकुटाने दोन मोटारसायकली नजीकच्या चौकात उटलून नेत ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्या. या घटनेत दुचाकी जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले असून अधिक तपास उफनिरीक्षक हाके करीत आहेत.