नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोविंदनगर, कर्मयोगीनगरसह प्रभाग २४ मध्ये डेंग्यू, मलेरियासह साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्या, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी यांना याबाबत शुक्रवारी, ५ जुलै रोजी निवेदन देण्यात आले. साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नगररचना व बांधकाम विभागाला सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मागील वर्षी कर्मयोगीनगर भागात डेंग्यूने एका डॉक्टरसह काही रुग्णांचा मृत्यू झाला. यावर्षी गोविंदनगरमध्ये महिनाभरात दोन मृत्यू झाले. घरोघरी ताप, डेंग्यू, मलेरियासह साथीच्या आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वत्र डासांचे प्रमाण वाढले आहे. वेळोवेळी धूर फवारणीही होत नाही. संपूर्ण प्रभागात डास निर्मूलन मोहीम सुरू करण्यात यावी, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावीत, रस्त्यांवर, बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या ठिकाणी साचणारे पाणी काढण्यासाठी बांधकाम व नगररचना विभागामार्फत संबंधितांना नोटिसा द्याव्यात, नंदिनी नदीतील डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी फवारणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. दखल घेवून कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, धवल खैरनार, संगीता देशमुख, विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, दिलीप निकम, बाळासाहेब देशमुख, अशोक पाटील, बन्सीलाल पाटील, बाळासाहेब राऊतराय, आनंदराव तिडके, निलेश ठाकूर, मनोज वाणी, सतीश मणिआर, दिलीप दिवाणे, भारती देशमुख, प्रतिभा पाटील, वंदना पाटील, हरिष काळे, दीपक दुट्टे, प्रथमेश पाटील, पुरुषोत्तम शिरोडे, परेश येवले, शिवाजी मेणे, संदीप गहिवाड, संग्राम देशमुख आदींनी दिला आहे.