नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सायबर गुन्ह्यामधील वाढ दिवसेंदिवस वाढतच आहे. आता शेअर ट्रेंडिगच्या बहाण्याने शहरातील एका ६३ वर्षीय वृध्दास भामट्यानी तब्बल ५९ लाखाला गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्बरा अॅन सॅम्युल (रा.एकलहरा रोड सिन्नर फाटा ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बार्बरा सॅम्युल यांच्याशी गेल्या मार्च महिन्यात भामट्यांनी संपर्क साधला होता. वेगवेगळया व्हॉटसअप नंबरच्या माध्यमातून संपर्क साधत भामट्यांनी सॅम्युल यांना आपल्या व्हॉटसग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. या ग्रुपवरील चॅटींगमध्ये शेअर मार्केट ट्रेडिंग मधील गुंतवणुकीतून मिळणा-या लाभाचे प्रलोभन दाखविण्यात आल्याने ही फसवणुक झाली.
सॅम्युल यांना विश्वासात घेण्यात आल्याने त्यांनी २८ मार्च ते ११ जून २०२४ दरम्यान एका लिंकच्या माध्यमातून तब्बल ५८ लाख ६९ हजार ३१५ रूपयांची गुंतवणुक केली. अभासी रक्कम जमा असल्याचे दर्शवून सॅम्युल याना गुंतवणुक करण्यास भाग पाडले आहे. सदरची गुंतवणुक ही बोगस ट्रेंडिग अॅप्लीकेशनच्या माध्यमातून करण्यात आल्याचे निदर्शनास येताच सॅम्युल यांनी संबधीताशी संपर्क साधला मात्र तो होवू शकला नाही त्यामुळे त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.