इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लंडनः ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा झटका बसला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव होताना दिसत आहे. मतमोजणी सुरू होताच, कीर स्टारमर यांच्या नेतृत्वाखालील विरोधी मजूर पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे.
पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचा ऐतिहासिक पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत ६५० पैकी ५८५ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. मजूर पक्षाने ३९० जागा जिंकून नेत्रदीपक आघाडी घेतली आहे. त्याचवेळी सुनक यांच्या पक्षाला केवळ ९९ जागा मिळाल्या आहेत.
एक्झिट पोलनुसार, ६५० जागांच्या संसदेत मजूर पक्ष ४१० जागा जिंकण्याची शक्यता आहे. आर्थिक मंदीचा सामना करूनही १४ वर्षे सत्तेत असलेल्या हुजूर (टोरीज) पक्षाला केवळ १३१ जागा मिळण्याची अपेक्षा होती. ती आता खरी ठरत आहे. हुजूर (टोरीज) पक्षाची ब्रिटनच्या निवडणूक इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी ठरणार आहे. सहा महिने अगोदर निवडणूगक जाहीर करण्याचा निर्णय सुनक यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. मजूर पक्षाचे सरकार तिथे सत्तेवर येणार आहे.