पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा २००२ ची थकबाकी प्रलंबित असल्याकारणाने व भरण्यास टाळाटाळ करत असल्याकारणाने मे. शर्मा सेल्स कॉर्पोरेशन या कंपनीला राज्यकर विभागाने दणका दिला आहे. तब्बल १ कोटी ३ लाख ४२ हजार ८४४ रूपयांचा कर बुडविल्याप्रकरणी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भवरलाल मोहनलाल शर्मा, सर्वे नं. ५३, मालविका कॉ. हौसिंग सोसायटी, एरंडवणे, पुणे यांच्यावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज्यकर निरीक्षक अरूण दत्तात्रय मुरूमकर यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही संपूर्ण कार्यवाही मा. अप्पर राज्यकर आयुक्त श्री. धनंजय आखाडे यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमती. रेश्मा घाणेकर (राज्यकर सहआयुक्त, पुणे-३) यांच्या नेतृत्वाखाली व श्री दिलीप पवार (राज्यकर उपायुक्त) तसेच श्री अरूण मुरूमकर (राज्यकर निरीक्षक) व श्री. जितेंद्र जगताप (कर सहायक) यांनी पार पाडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अरूण दत्तात्रय मुरूमकर हे येरवडा येथील वस्तू व सेवा कर भवन येथे राज्यकर निरीक्षक म्हणून पदावर आहेत. कोणत्याही व्यापा-याने कोणतीही मालाची विक्री केली असता त्या व्यापा-याने कराची रक्कम वसूल करून ती शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करायची असते. मे. शर्मा सेल्स कॉर्पोरेशन ही कंपनी खाद्य तेलाचा विक्रेता म्हणून व्यवसाय करीत होती. ही कंपनी ४०८ ए मार्केट यार्ड पुणे-४११०३७ येथे कार्यरत होती. या कंपनीचे मालक श्री. भवरलाल मोहनलाल शर्मा यांना विक्रीकराची थकबाकी भरणेकरिता वारंवार सूचित केले होते. वसुलीसंबधी कायदयान्वये कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यालाही योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने व तब्बल १ कोटी ३ लाख ४२ हजार ८४४ रूपयांचा कर चुकवल्याने कंपनीच्या मालकावर महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा २००२ अंतर्गत कलम ७४(२),७४(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.