इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – राज्यात मराठा आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींविरोधात आंदोलक आक्रमक झाले असतांना दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र मराठा समाजातील शेतकर्यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार सौ. देवयानी सुहास फरांदे यांची भेट घेत जायकवाडीला पाणी न सोडण्याच्या त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
जिल्हयात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असतांना नाशिककरांचा विचार न करता नाशिकच्या गंगापूर, दारणा धरण समूहातून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने आदेश दिले आहेत. मात्र या निर्णयाविरोधात भाजपच्या नाशिक मध्यच्या आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून नाशिक आणि नगर भागातील लाभार्थ्यांवर या चुकीच्या निर्णयामुळे अन्याय होईल अशी भूमिका मांडली. दरम्यान केवळ विरोध न नोंदवता आ. फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करत वस्तुस्थिती मांडली. यंदाच्यवर्षी विशेष बाब म्हणून जायकवाडीच्या मृत साठयातून जायकवाडी जलाशयात ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होण्यासाठी ५.९४ टीएमसी पाणीसाठा वापरण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. गत अनुभव पाहता पाणी सोडल्यावर वहनतूट ४० ते ४५ टक्केे येणार आहे. त्यामुळे जायकवाडीत यातील किती पाणी पोहचू शकेल, असा सवालही आ. फरांदे यांनी उपस्थित केला. त्यामुळे नाशिकमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती दिल्याचे बोलले जाते.
आम्ही तुमच्या पाठीशी –
नाशिकमधून जायकवाडीला पाणी सोडल्यास याचा परिणाम शेती व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे शेतकरीवर्ग आक्रमक झाला आहे. आमदार फरांदे यांनी याप्रश्नी नाशिककरांच्यावतीने विरोध नोंदवल्याने सिद्ध पिंप्री गावातील मराठा समाजाच्या शेकडो शेतकरी तरूणांनी आमदार फरांदे यांच्या नाशिकमधील निवासस्थानी त्यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठींबा दर्शवत त्यांचे आभार मानले. पाणीप्रश्नी आम्ही आपल्यासोबत असल्याचे यावेळी सांगत शेतकर्यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत वास्तव मांडले. यावेळी अनिल ढिकले, भाऊसाहेब ढिकले, शंकर ढिकले, मनोज जाधव, यशवंत ढिकले, जयराम ढिकले, नामदेव ढिकले, देविदास पाटील, पंडित जाधव, बाळासाहेब उखाडे, अंबादास ढिकले, उत्तम ढिकले आदींसह शेतकरी उपस्थित होते.