इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील भारतीय कुस्तीपटू समर्थ महाकवे (१६) याने आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले.२२ ते ३० जून या कालावधीत जॉर्डन येथे झालेल्या ग्रीको-रोमन अंडर-१७ आशियाई कुस्ती स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. ही त्याची पहिली अधिकृत आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होती.
समर्थचा अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या सरदोर खोलमुर्झाएव याच्याशी सामना झाला. अतिशय चुरशीच्या सामन्यात, समर्थने ६-४ असा गुण फरकाने दुसरे स्थान पटकावले. सब ज्युनियर आशियाई कुस्ती स्पर्धेचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अमोल यादव म्हणाले, “आशियाई कुस्ती स्पर्धेत समर्थ महाकवेच्या कामगिरीचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. “हे यश समर्थच्या कठोर परिश्रमाचे आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सामूहिक प्रयत्नांचा दाखला आहे,” त्यांनी अभिमानाने पुढे सांगितले, “आम्ही आपल्या देशासाठी समर्थ सारख्या अधिकाधिक क्रिडापटूंना पुढे आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,”. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या रचनात्मक उद्दिष्टामुळे तीन वर्षांनंतर संघाला आंतरराष्ट्रीय पदक जिंकता आले आहे.
संघाच्या विविध पैलूंबद्दल बोलताना, ते पुढे म्हणाले की, “आमच्या संघात उच्च-कार्यक्षमता असलेले प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ञ आणि सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे, आमच्या प्रशिक्षण प्रक्रियेत पद्धतशीरपणे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यात आला आहे. साईचे (भारतीय क्रीडा प्राधिकरण, SAI) प्रादेशिक संचालक, पांडुरंग चाटे यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ यामुळे संघाला खूप मदत झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
समर्थ महाकवे ग्रीको-रोमन कुस्ती (५५ किलो गट) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या U-17- या १७ वर्षांखालील (५५ किलो गट) गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सहभागी होणार आहे. या स्पर्धा उधम सिंग नगर (पंतनगर), उत्तराखंड येथे ५ ते ७ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहेत. भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी, आगामी काळात क्रीडा क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत अग्रेसर राहील,असे भारतीय क्रीडा प्राधिकरण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, यांनी नमूद केले आहे. .
अम्मान, जॉर्डन येथे झालेल्या १७ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत चार सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्यांसह भारतीय तुकडीने ११ पदके मिळवली होती.