इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विश्व विजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह येथे क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीसाठी सर्व रस्त्यावर आले आहे. तुफान गर्दी व जल्लोषाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आज टीम इंडियाची व्हिक्ट्री परेड आहे. मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली आहे.
रोहित शर्माने संपूर्ण देशातील चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी मरीन ड्राईव्हमध्ये येण्याचे निमंत्रण दिले असून, ‘सोशल मीडिया’वर ‘आम्हा सर्वांना तुमच्याबरोबर या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. चला तर मग आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या विजयी परेडसह हा आनंद साजरा करूया,’ असे त्याने म्हटले होते. त्याला आज चांगलाच प्रतिसाद मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आज मायदेशी दाखल झाल्यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ लोक कल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मोदींनी टीम इंडियाचे स्वागत करत भरभरुन कौतुकही केले. जवळपास दीड तास मोदींनी विश्व विजेत्या खेळाडूंशी चर्चा केली. मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मुंबईसाठी रवाना झाली.
दिल्लीतही जोरदार स्वागत
यंदाच्या टी-२० विश्वचषकावर ‘टीम इंडिया’ने नाव कोरले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. ‘टीम इंडिया’ विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन भारतात दाखल झाली आहे. वेस्ट इंडिजवरून ‘टीम इंडिया’ थेट दिल्लीमध्ये पोहोचली असून दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी गर्दी केली होती. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. विमानतळावर रोहित शर्माने ट्रॉफीसह एन्ट्री केली, तेव्हा एकच जल्लोष करण्यात आला. रोहितने चाहत्यांसाठी ट्रॉफी उंचावून दाखवली.