इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पिंपरी-चिंचवडमधील अजितदादांच्या दोन युवा नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे विधानसभा अध्यक्ष आणि माजी शहर युवक अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी पाटील यांच्यासमेवत चर्चा केली होती.
वाकडकर यांची मे २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली होती. त्या वेळी जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर वाकडकर अजित पवारांसमवेत गेले; परंतु आता आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आणि राजकीय वातावरण लक्षात घेत वाकडकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत राहून तुतारी वाजवण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक आमदार व पदाधिकारी संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता.