इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः यंदाच्या टी-२० विश्वचषकावर ‘टीम इंडिया’ने नाव कोरले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. ‘टीम इंडिया’ विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन भारतात दाखल झाली आहे.
वेस्ट इंडिजवरून ‘टीम इंडिया’ थेट दिल्लीमध्ये पोहोचली असून दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी गर्दी केली होती. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. विमानतळावर रोहित शर्माने ट्रॉफीसह एन्ट्री केली, तेव्हा एकच जल्लोष करण्यात आला. रोहितने चाहत्यांसाठी ट्रॉफी उंचावून दाखवली. त्यानंतर कर्णधारासह सर्व टीम हॉटेलकडे रवाना झाली. सकाळी ११ वाजता ‘टीम इंडिया’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवासस्थानी भेट घेणार आहेत. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर ‘टीम इंडिया’ ट्रॉफीसह मुंबईत येणार आहे. संध्याकाळी पाच वाजता मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली निघणार आहे.
रोहित शर्माने संपूर्ण देशातील चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी मरीन ड्राईव्हमध्ये येण्याचे निमंत्रण दिले असून, ‘सोशल मीडिया’वर ‘आम्हा सर्वांना तुमच्याबरोबर या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. चला तर मग आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या विजयी परेडसह हा आनंद साजरा करूया,’ असे त्याने म्हटले आहे.