नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून मंगळवारी (दि.२) वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. त्यातील महिलेने विषारी औषध सेवन करून तर सिडकोतील एकाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. याबाबत आडगाव आणि अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून मृतांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.
छत्रपती संभाजीनगर रोड भागात राहणा-या अनिता दौलत सहाणे (३४ रा. मळयात ओढागाव ता.जि.नाशिक) यांनी २७ जून रोजी अज्ञात कारणातून आपल्या रहात्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच पती दौलत सहाणे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी उपचार सुरू असतांना डॉ. रोहित टेकळे यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील गणेशचौकात घडली. मयुर शाम निकम (३३) या व्यक्तीने मंगळवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये झोळीसाठी बांधलेल्या दोरीने गळफास लावून घेतला होता. वडिल शामसुंदर निकम यांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईख आवारे करीत आहेत.
तीन जणांच्या टोळक्याने दोघा भावांना केली बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुठलेही कारण नसतांना तीन जणांच्या टोळक्याने दोघा भावांना बेदम मारहाण केल्याची घटना साई संतोषी नगर भागात घडली. या घटनेत स्टील पाईपाचा वापर करण्यात आल्याने युवक जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आतिक शेख,अमन शेख व आसिफ शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत असीम निसार शेख (२७ रा.मातोश्री कॉलनी,अशोका स्कूल मागे,खोडेनगर) या युवकाने फिर्याद दिली आहे. असीम व रियान शेख हे दोघे भाऊ रविवारी (दि.३०) सायंकाळी साई संतोषीनगर भागात गेले असता ही घटना घडली. संशयितांनी त्यांना गाठून कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ करीत दोघा भावांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी आसिफ शेख याने स्टीलच्या पाईपाचा वापर केल्याने असीम शेख जखमी झाला असून अधिक तपास जमादार बकाल करीत आहेत.