नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे एक लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ८० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनम रमेश कदम (रा.जनाई रो हाऊस,राज्य कर्मचारी वसाहत अशोकनगर ) यांनी फिर्याद दिली आहे. कदम कुटूंबिय सोमवारी (दि.१) दुपारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूमच्या कपाटात ठेवलेली ८० हजाराची रोकड व सोन्याचादीचे दागिणे असा सुमारे १ लाखाचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्याच्या कडेला उभे राहून मोबाईलवर बोलणा-या व्यक्तीच्या हातातून भामट्या दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावून नेल्याची घटना देवळाली गाव परिसरात घडली. या घटनेत ४० हजाराचा मोबाईल भामट्यांनी लांबविला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदिप दत्तात्रेय जाधव (५८ रा.श्रीरामनगर,लोखंडेमळा जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जाधव मंगळवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास देवळाली गावातून आपल्या घराकडे दुचाकीवर जात असतांना ही घटना घडली. म्हसोबा मंदिर परिसरात फोन आल्याने ते रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क करून मोबाईलवर बोलत असतांना विरूध्द दिशेने आलेल्या दुचाकीस्वारानी त्यांच्या हातातील सुमारे ४० हजाराचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.