नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मान्सूनच्या हंगामात राष्ट्रीय महामार्गावर पाणी साठण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने(NHAI) देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर पूर सज्जता आणि आकस्मिक प्रतिसादासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. डोंगराळ आणि मैदानी या दोन्ही प्रदेशात प्रभावी तोडगे काढण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोनाचा अवलंब करत प्राधिकरण इतर कार्यान्वयन संस्था, स्थानिक प्राधिकरणे आणि प्रशासन यांच्यासोबत समन्वयाने पूर/ भूस्खलन प्रभावित ठिकाणांवर तातडीने यंत्रणा आणि मनुष्यबळ तैनात करण्यासाठी काम करत आहे.
त्या व्यतिरिक्त प्रभावी आपत्ती सज्जतेसाठी संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्राधिकरण महत्त्वाची यंत्रसामग्री वेळेवर तैनात करण्यासाठी त्यांच्या उपलब्धतेवर देखील लक्ष ठेवत आहे. राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साठून राहू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राज्य सिंचन विभागासोबत संयुक्त पाहणी करून कोणताही वाहता कालवा/ओढा नव्या बांधण्यात आलेल्या महामार्गामुळे अडवला जात नाही ना हे सुनिश्चित करत आहे.तसेच शहरी भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर, ज्या ज्या भागात पाणी साठून राहण्याची शक्यता आहे त्या भागात पुरेशा प्रमाणात पंपांची व्यवस्था करत आहे. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर, आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली यासोबत राजमार्गयात्रा ऍप यांचा वापर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याची माहिती घेण्यासाठी करता येईल.
डोंगराळ भागात, प्रत्येक भूस्खलन प्रवण स्थानावर राज्य प्रशासनाच्या अतिशय निकटच्या समन्वयाने पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणा असलेल्या समर्पित आकस्मिक प्रतिसाद टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील 24×7 कनेक्टिव्हिटी सुरू राहण्यासाठी त्यावर निर्माण झालेला कोणताही अडथळा तातडीने दूर होईल आणि सुरक्षित आणि सुविहीत वाहतूक उपलब्ध होईल. एनएचएआय चे अधिकारी पुराचा इतिहास असलेल्या विविध संरचनांची देखील तपासणी करत आहेत, जेणेकरून पुलांचे खांब आणि कमानींचे झालेले नुकसान लक्षात घेता येईल. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना सावध करण्यासाठी असुरक्षित ठिकाणी इशारा देणारी चिन्हे बसवली जातील. प्रचंड भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर ज्या स्थानांवर मार्ग बंद होईल, त्या स्थानांवर पर्यायी वळण योजना जिल्हा प्रशासनाच्या सोबत तयार केली जात आहे.