नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने खासदार अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद या पदावर नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीनंतर खा. कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले.
ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सौ.सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार !