नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ओमनगर भागात तोतया पोलीसांनी मदतीच्या बहाण्याने महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. या घटनेत ७५ हजाराच्या बांगड्यांवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिराबाई कृष्णा चव्हाण (७८ रा.स्नेहधारा अपा.महाराष्ट्र कॉलनी हिरावाडीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. हिराबाई चव्हाण या वृध्दा मंगळवारी (दि.२) सकाळी शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. ओमनगर येथील महावीर बंगल्यासमोरून त्या रस्त्याने पायी जात असतांना दोघा भामट्यांनी त्यांना गाठले.
पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवण्याचा सल्ला दिला. यावेळी पिशवीत बांगड्या ठेवण्यासाठी मदतीचा हात देवून भामट्यांनी सुमारे ७५ हजार रूपये किमतीच्या दोन बागड्या हातोहात लांबविल्या. अधिक तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.