इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः पेपर फुटीमुळे आता कडक पाऊले उचलण्यात येत आहे. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी प्रश्नपत्रिका दोन तास अगोदर सेट करून ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत विचार केला जाऊ शकतो .‘नीट-यूजीसी’ची रद्द झालेली परीक्षा ऑगस्टच्या मध्यात घेतली जाऊ शकते अशी चर्चा आता सुरु आहे.
ऑनलाइन परीक्षेच्या तयारीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयात बैठक झाली. त्यात परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाली. यापूर्वी २३ जून रोजी होणारी परीक्षा १२ तास आधीच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना मानसिक धक्काच बसला. ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे (एनबीई) आयोजित केली जाते. या बैठकीत सायबर सेलचे अधिकारीही उपस्थित होते.
‘नीट-यूजीसी पीजी’सारख्या मोठ्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे लॉजिस्टिक पार्टनर टीसीएस आणि सरकारसोबत चर्चा केली जात आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर होतील. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेचा पेपर दोन तास अगोदर सेट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.